पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील वाखरी – वडाचीवस्ती- खेड भाळवणी हा वहिवाटीचा रस्ता दोन शेतकऱ्यांच्या वादात उखडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत असून, सदरचा रस्ता वाहिवटीस खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वाखरी ते वडाची वस्ती या रस्त्यासाठी आमदार निधीतून निधी मंजूर झाला आहे. त्याचे कामही सध्या चालू आहे. या रस्त्याची काही ठिकाणी रस्त्यालगतच्या स्थानिक शेतकऱ्यांनी अडवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. तरी स्थानिक नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता तात्काळ चालू करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
जून महिन्यात यापूर्वी रस्ता आढविलेला होता, त्यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पत्र व्यवहार केल्यानंतर मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत रस्ता खुला करण्यात आला होता. त्यावेळी एका शेतकऱ्याने रस्ता मोजला नव्हता. एकाने मोजला होता. ग्रामसभेत याबाबत आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर पदाधिकारी, अधिकारी यांनी पाहणी केली. त्यावेळी रस्ता खुला करण्यात आला. त्यानंतर गेल्या चार दिवसापूर्वी हा रस्ता नांगरून टाकण्यात आला आहे.
———–
जि.प. बांधकाम विभागाला पत्र
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ज्यांनी उखडला आहे, त्यांच्यावर कारवाई करावी याबाबतचे पत्र पंढरपूर तहसील यांनी बांधकाम विभाग अभियंता पंढरपूर यांना पाठविले असल्याचे मंडल अधिकारी भडंगे यांनी सांगितले.

























