बार्शी – बार्शीच्या शिक्षण क्षेत्राला मोठी परंपरा असून बार्शीतील शिक्षकांचीही सर्वत्र ख्याती आहे. त्यामध्ये, महिला शिक्षकांचेही मोलाचे योगदान राहिले आहे. त्यातूनच बार्शी तिथं सरशी हे ब्रीद पुन्हा अधोरेखित करत अमृता अशोक शहा यांनी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवला. विद्यार्थ्यांप्रतिची तळमळ, शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणे आणि प्रयोगशील विद्यादान ह्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
अमृता शहा या यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर इंग्लिश स्कूल, बार्शी येथे क्लास टीचर असून त्यांना मिळालेल्या या राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सोजर स्कुल आणि बार्शीच शैक्षणिक क्षेत्रातील स्थान आणि गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष विद्या देवधर यांच्या हस्ते २ ग्लोरी ऑफ ग्लोब अचिव्हर्स पुरस्काराने अमृता शहा यांना गौरविण्यात आले. तसेच, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सानीपिना जयलक्ष्मी राव मॅम यांनीही त्यांचा यथोचित सन्मान केला. हैद्राबाद येथील रविंद्र भारती नाट्य सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराबद्दल अमृता शहा यांचं शिक्षण क्षेत्रातून आणि विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
























