सोलापूर – दत्त जयंतीनिमित्त दाजी पेठ येथीला दत्त मंदिर भाविकांनी अक्षरशः फुलून गेला होते. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने परिसर दुमदुमलागेला होता. पहाटेच्या सुमारास दर्शनासाठी हजारो भाविकांची रेलचेल सुरू झाली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत असतानाही भक्तांच्या चेहऱ्यावर अनोखा उत्साह आणि भक्तिभाव झळकत होता. मंदिराच्या प्रांगणात अखंड नामजप, यज्ञ आणि विशेष पूजांचे आयोजन करण्यात आले होते.

दत्त जयंतीनिमित्त सोलापूर शहरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले असून, सर्वात जुने म्हणून ओळखले जाणारे दत्त चौकातील श्री दत्त मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. गुरुवार आणि दत्त जयंती एकत्र आल्यानं सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. रंगीत फुलांचे तोरण, दीपमाळा आणि सजावट यामुळे मंदिराचा परिसर अधिकच देखणा दिसत होता. सकाळी महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली. सत्संग, कीर्तन, अभिषेक, महाप्रसाद अशा अनेक उपक्रमांमुळे भक्तांचे दर्शन आणि धार्मिक वातावरण अधिक उत्साहवर्धक झाले. भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर प्रशासन आणि स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केली होती. दर्शन रांगा सुव्यवस्थितपणे हलवण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते.

मड्डी वस्तीत उत्सवाचे 50 वे वर्ष
भवानी पेठ मडी वस्ती येथील दत्तात्रेय शक्ती मंदिरात दत्त जन्मोत्सवानिमित्त भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यंदा उत्सवाचे पन्नासावे वर्धापन वर्ष असल्याने मंदिर विशेषरित्या सजवण्यात आले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि परिसर भक्तिमय वातावरणाने निनादत होता.



























