सोलापूर – ज्ञानसम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या प्रकट दिनानिमित्त होटगी रोडवरील गांगजी पार्क येथे आयोजित भव्य ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवारी सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील तब्बल ५०० भाविकांनी सहभाग नोंदवून अध्यात्मिक वातावरण अधिक उत्साहपूर्ण केले.
ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ. प. नामदेव महाराज पवार (श्रीगोंदा) यांनी व्यासपीठ भूषवले. आठ दिवस चालणार्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तर ह. भ. प. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला दादाराव ताकमोगे, बसवराज पनशेट्टी, शावरप्पा वाघमारे, पत्रकार अजित उंब्रजकर, अरविंद सुरवसे, दिपक हरवाळकर, अनिल देठे, मल्लिनाथ बबलेश्वर, निवृत्ती महाराज ताकमोगे, निंगय्या स्वामी, संतोष एकनाथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकाळी बसवराज पनशेट्टी यांच्यावतीने तर सायंकाळी खंडाळकर परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांचे हरिकीर्तन रसिकांना लाभले. तसेच मुक्ताई भजनी मंडळ व निराळे वस्ती भजनी मंडळांच्या भजनांच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला.
























