सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित प्रिसिजन वाचन अभियानात “कहाणी वंदे मातरम् ची” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेखक मिलिंद प्रभाकर सबनीस यांची मुलाखत पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी घेतली.
वंदे मातरमचा १५० वर्षांचा प्रवास, गीतामागील इतिहास, दंतकथा आणि त्याचे राष्ट्रभावनेशी नाते यावर हा संवाद रंगला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेखक मिलिंद सबनीस आणि मुलाखतकार सिद्धाराम पाटील यांचा प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ओमप्रकाश बारड यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. दुर्मिळ धर्मग्रंथ, आध्यात्मिक साहित्य आणि प्राचीन वस्तू जपून ठेवण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षे केले असून, आजही त्यांनी तो वारसा लोकांसाठी खुला ठेवला आहे.
मिलिंद सबनीस यांनी सांगितले की, त्यांनी गेली 30 वर्षे ‘वंदे मातरम्’ या गीताचा सखोल अभ्यास केला आहे. दिवाळी अंक बंद करून, पूर्ण वेळ या विषयाचा शोध घेतला.
वंदे मातरम् गीताच्या निर्मितीविषयी अनेक दंतकथा प्रचलित असून, 1875 साली नैहाटी येथे हे गीत लिहिले गेल्याचा उल्लेख ते करतात. ‘आनंदमठ’ ही कादंबरी अध्यात्म आणि राष्ट्रभावनेची सांगड घालणारी ही रचना आहे, असंही त्यांनी सांगितल.
रविंद्रनाथ टागोर यांनी 1896 च्या कलकत्ता अधिवेशनात प्रथमच हे गीत सार्वजनिकरित्या गायले होते, ही ऐतिहासिक नोंदही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे व्यासपीठावर फडकणारा तिरंगा आणि उपस्थितांचा देशभक्तिपर सहभाग. विशेषत: Adv. जे. जे. कुलकर्णी आणि डॉ. सुहासिनी शहा यांनी केलेली देशभक्तीपर वेशभूषा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी “जण मन गण – पितृगीत, आणि वंदे मातरम – मातृगीत!” असा भावपूर्ण संदर्भ देत सबनीस यांनी वंदे मातरमच्या आदरस्थानाबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच ‘आनंदमठ’ या कादंबरीची मराठी आवृत्ती लवकरच सोलापूरात प्रकाशित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्रिसिजन वाचन अभियानाच्या माध्यमातून देशभक्ती, साहित्य आणि इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हेतू साधणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सफल ठरला.
प्रसाद जिरांगलगीकर यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरमने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी केले.


























