धाराशिव – जागतिक मृदा दिन निमित्त श्री सिद्धीविनायक सोसायटी, धाराशिव यांच्या वतीने खामसवाडी येथे माती व पाणी परीक्षण संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य तपासणीसाठी अत्यावश्यक आणि वैज्ञानिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
या केंद्रात मातीतील पोषकतत्त्वांचे विश्लेषण, पाण्याची गुणवत्ता तपासणी, संतुलित खत व्यवस्थापन, तसेच पिकउत्पादन वाढीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन अशा सेवा अल्प दरात देण्यात येणार आहेत. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी वैज्ञानिक विश्लेषण गरजेचे असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रयोगशाळा प्रमुख चंद्रशेखर गाडेकर यांनी माती परीक्षणाचे फायदे स्पष्ट करताना सांगितले की, “मातीचे अचूक परीक्षण केल्याने खतांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करता येतो. त्यामुळे उत्पादनात १५ ते २५ टक्के वाढ होते. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर टळून खर्चात बचत होते.
मातीतील pH, सेंद्रिय कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता परीक्षणातून ओळखता येते. त्यामुळे वैज्ञानिक शेती, पिक फेरपालट, आणि टिकाऊ उत्पादन शक्य होते. कार्यक्रमास श्री सिद्धीविनायक परिवारातील गजानन पाटील, प्रयोगशाळा प्रमुख चंद्रशेखर गाडेकर, बलराम कुलकर्णी, तसेच गावातील शेतकरी अनिल शेळके, नाना भुतेकर, विश्वास कोकणे, श्रीनिवास झोरी, विजयकुमार झोरी, राजेश गरड, सादिक सय्यद, श्रीमंत शेळके, सतिश वैदय, निशिकांत महाजन, सुशीलकुमार पारील, दत्तात्रय शेळके, महेश शेळके, श्रीमंत पाटील, प्रशांत सुरवसे, सुशिल यादव, कुलदीप सावंत, विकासकुमार झोरी, उध्दव शेळके, दत्ता जोशी यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
जागतिक मृदा दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे निरोगी मृदा भरघोस उत्पादन हा संदेश बळकट होत असून, शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. हे केंद्र उत्पादनक्षमता वाढविण्यास आणि खर्चात बचत करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


























