अहिल्यानगर – शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे आज विशेष मोहीम राबविण्यात आली. रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या हॉकर्स, ठेलेवाले तसेच दुकान व वाहन चालकांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
आज (५ डिसेंबर) सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या आदेशानुसार वाहतूक कोंडी होत असलेल्या प्रमुख चौक व रोडवर तपासणी मोहीम राबविण्यात आली.
कारवाई कापड बाजार, पराग बिल्डिंग परिसर, चांद सुलताना हायस्कूल, महात्मा फुले चौक, नेप्ती नाका, चितळे रोड, सर्जेपुरा चौक, पत्रकार चौक ते प्रेमदान चौक मार्ग आणि जीपीओ चौक या एकूण ९ ठिकाणी करण्यात आली.
मोहिमेदरम्यान कलम १२२ मोटार वाहन कायद्यानुसार ६०, कलम १०२ मुंबई पोलिस कायद्यानुसार ३५ तसेच भारतीय दंड संहिता कलम २८५ अंतर्गत ३२ असे एकूण १२७ गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधितांना न्यायालयात हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
पोलीस दलामार्फत अशा प्रकारची पहिलीच दमदार कारवाई असून नगरकरांमधून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर तसेच संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



























