सोलापूर – तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची रौप्यमहोत्सवी जयंती राज्यभर साजरी केली जात आहे. याचे औचित्य साधून प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत सुनिलकुमार लवटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदरचे व्याख्यान रविवारी सायंकाळी ६ वा. हिराचंद नेमंचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएट रमध्ये होणार असल्याची माहिती प्रगतिशील लेखक संघाचे सदस्य रविंद्र मोकाशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
प्रज्ञ पाठशाळा आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून तर्कतिर्थांनी भरीव अशी ज्ञाननिर्मिती केली आहे. महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निर्मुलनाच्या प्रयत्नांना तात्विक बैठक देण्याचे कामही जोशी यांनी केले आहे. तब्बल सहा दशके अविरत जोशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. जोशींच्या साहित्याचे अभ्यासक म्हणून सुनिलकुमार लवटे हे परिचित आहेत. ते ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे योगदान’ या विषयावर मांडणी करणार आहेत.
लवटे यांनी तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे वीस खंड संपादित केले आहेत. राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने हे खंड नुकतेच प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे लवटे यांना व्याख्यानासाठी आमंत्रीत करण्यात आले आहे. सदरच्या व्याख्यानास सोलापूरकरांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन नानासाहेब गव्हाणे यांनी केले आहे.


























