सोलापूर – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ (पिंपळनेर) आणि युनिट नं. २ (करकंब) यांचा सन २०२५–२६ चा गाळप हंगाम सुरळीतपणे सुरू असून, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ अखेर गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन २,८५० रुपये प्रमाणे पहिला हप्ता ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
चालू हंगामातील गाळपाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आजअखेर युनिट नं. १ पिंपळनेर येथे ५,४१,४२५ मे. टन, तर युनिट नं. २ करकंब येथे १,९०,०२८ मे. टन असे एकूण ७,३१,४५३ मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. यापूर्वी २० नोव्हेंबरअखेर गाळपास आलेल्या ऊसाचे बिल बँकेत वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर २१ ते ३० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीतील ऊस बिलही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, यासाठी ५३ कोटी १४ लाख रुपयांची अदायगी करण्यात आली आहे.
दिनांक १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीतील एकूण ऊस बिलापोटी १८६ कोटी ८३ लाख रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे. मागील चार गाळप हंगामांपासून दर दहा दिवसांनी ऊस बिल देण्याची परंपरा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने जपली असून, यंदाही हीच कार्यपद्धती यशस्वीरीत्या सुरू ठेवण्यात आली आहे. वेळेत ऊस बिल व तोडणी-वाहतूक बिले मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या कारखान्यावर दृढ विश्वास असून, मोठ्या संख्येने शेतकरी आपला ऊस याच कारखान्याकडे देत आहेत.
कारखाना व्यवस्थापनाने चालू हंगामासाठी युनिट नं. १ कडे २० लाख मे. टन व युनिट नं. २ कडे ५ लाख मे. टन असे एकूण २५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सर्व सभासद व ऊस पुरवठादारांनी केलेल्या सहकार्यामुळे हंगाम सुरळीत सुरू आहे.
सन २०२५–२६ च्या उर्वरित गाळप हंगामातही सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासच पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मा. बबनराव शिंदे यांनी केले आहे.


























