सोलापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांना बाजार समिती परस्परपूरक आहेत. मात्र व्यापाऱ्यांनी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक बंद गुरुवारी कामगारांसाठी उपासमारीचा दिवस ठरला आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या हेतूसाठी हा बंद पुकारला. परंतु त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांचा विचार केला नाही. हातावरचे पोट असणाऱ्या कामगारांसाठी अशा परिस्थितीत दिवस काढणे अत्यंत कठीण आहे. असा नाराजीचा सूर बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध कामगार संघटनांनी व्यक्त केला.
दरम्यान, भुसार व अडत व्यापारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक बंद यशस्वी झाला. बाजार समिती मधील भुसार व अडत व्यापारी विभाग पूर्णतः बंद होता. किराणा, भुसार, मसाला, ऑइल मिल, डाळमिल असे विविध विभाग या बंद सहभागी होते. परंतु, या विभागात कार्यरत असणाऱ्या समारोह हजारो कामगारांवर उपासमारीची कुराड कोसळली. एक दिवसाची हजेरी यामुळे कामगारांची बुडाली. यापरिस्थितीत कामगारांसाठी कोण मदतीचा हात देणार? असा प्रश्न आता कामगार संघटनांमधून उपस्थित केला जात आहे.
कामगार कायद्याप्रमाणे कामगारांना त्यांच्या कामाचे मोबदला देणे बंधनकारक आहे. परंतु अशा बंद आणि संपच्या काळामध्ये कामगारांची मोठी उपासमार होते. त्यावेळी प्रशासन किंवा बाजार समिती याकडे दुर्लक्ष करते. अशा परिस्थितीत शासनाने योग्य निर्णय घ्यावा. अशी मागणी देखील मातोश्री रमाबाई आंबेडकर माथाडी कामगार संघटनेकडून केली जात आहे.

























