पंढरपूर – व्यापारी बंधूनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राज्यव्यापारी व्यापारी बंदची हाक दिली होती. या बंदला येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फुर्त प्रतिसाद देत बंद मध्ये सहभाग नोंदविल्याची माहिती येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी दिली.
या राज्यव्यापी व्यापारी बंद संदर्भात माहिती देताना पंढरपूर येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहोळकर यांनी सांगितले की, शासनाकडून आकारली जाणारी दुबार सेस पध्दती रद्द करावी तसेच भेसळ प्रतिबंधक कायद्यातील काही जाचक तरतूदी व्यापाऱ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. या मध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी शासनाकडे अनेक वेळा गार्हाणे मांडलेले आहे. मात्र यावरती शासनाकडून आज पर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या या न्यायहक्काच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी राज्यव्यापी बंद पुकारलेला होता.
या बंदला येथील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
दरम्यान पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणाऱ्या भाविकांचे हाल होवू नयेत म्हणून दुपारी १२ वाजे पर्यंत मंदिर परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या प्रमाणे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर येथील व्यापारी कमिटी येथे सर्व व्यापारी बांधवांनी एकत्र येवून तेथून तहसील कचेरी मध्ये जावून शासनाला आपल्या विविध मागण्यांचे व्यापारी बांधवांनी निवेदन देखील दिले.
या वेळी सोमनाथ डोंबे, दिपक शेटे, संजय लिगाडे, संजय जवंजाळ,प्रिन्स गांधी,नितीन गांधी,प्रकाश कुलकर्णी, सचिन फडे आदी व्यापारी बांधव उपस्थित असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी दिली.
———————–
व्यापाऱ्यांच्या या मागण्यांचा निवेदना उहापोह
अन्नधान्य व खाद्यवस्तुंवर ५ टक्के जीएसटी लागू आहे. त्यामुळे सेस रद्द करावा. २६ आँगस्ट २०२४ च्या बैठकीतील अनिर्णित विषयांवर पुन्हा बैठक लावून सर्व विषय मार्गी लावावेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमधील बदला संदर्भात कृती समिती बरोबर चर्चा करुन निर्णय घ्यावा. अन्नसुरक्षा कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने आँनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन द्यावेत.
























