सोलापूर : सोलापुरात २४ तास हृदयरोग सेवा उपलब्ध असणाऱ्या एसीएस हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील अवघ्या ९ महिन्यांच्या बाळावर ‘पीडिए डिव्हाईस क्लोजर’ आणि लातूर येथील ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर ‘टॅव्ही’ ही अतिजिटल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. याबाबत हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्धांत गांधी आणि हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
लातूर येथील तब्बल ९१ वर्षे वय असलेले जेष्ठ नागरिक हृदयासंबंधीत आजाराने त्रस्त होते. गेल्या वर्षीपासून त्यांना दम लागणे, छातीत दुखणे, भोवळ येणे असा असलेला त्रास मागील महिनाभरात वाढला होता. टू डी इको चाचणी केल्यानंतर हृदयातील झडप खराब असल्याचे निदान झाले होते. त्यांचे वय खूप असल्याने पायातील रक्तवाहिनीमार्गे झडप बदलावी लागणार होती. त्यावेळी डॉ. सिद्धांत गांधी यांनी रुग्णाला संभाव्य धोके, उपचारासाठीची कल्पना देऊन झडप बदलण्याचा सल्ला दिला. वयोवृद्ध रुग्णाला एसीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्यांचा दम खूप वाढला होता. तसेच किडनीवर सूज होती. त्याचबरोबर हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया ४०% च होत होती. डॉ. सिद्धांत गांधी यांनी अतिशय कौशल्याने ९१ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पायातून पायातील रक्तवाहिनीच्या माध्यमातून हृदयाची खराब झालेली झडप बदलली. रुग्णाची शारीरिक आणि मानसिकही स्थिती उत्तम असल्याचा परिणाम म्हणून रुग्णाने उपचारास अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला, असे हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्धांत गांधी यांनी याप्रसंगी सांगितली. डॉ. सिद्धांत गांधी यांना या कामी डॉ. दीपक गायकवाड, डॉ. चिराग पारेख, डॉ. विजय अंधारे , भूलतज्ज्ञ डॉ. मंजूनाथ डफळे यांची मदत झाली.
लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असण्याची घटना एक हजार मुलांमधून एक आढळते. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला ही समस्या असल्याचे लक्षात आल्यानंतर बाळाच्या पालकांनी विजयपूर तसेच कलबुर्गी येथे पुढील उपचारासाठी धाव घेतली होती. परंतु केवळ बंगळुरू, मुंबई किंवा पुणे येथे याबाबतची शस्त्रक्रिया होऊ शकते असे त्यांना सांगण्यात आले होते. आर्थिक चडचण आणि बाळाची गंभीर शारीरिक समस्या अशा दुहेरी संकटात सापडलेल्या पालकांना इंडी तालुक्यातील काही नागरिकांनी डॉ. राहुल कारीमुंगी यांच्याकडे तपासणी आणि उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पालकांनी तब्बल ६ मिमी छिद्र असलेल्या त्या बाळाची डॉ. राहुल कारीमुंगी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर त्यांनी बंगळुरू, मुंबई किंवा पुणे येथे असलेले आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून सोलापुरातच तब्बल ७० टक्के कमी खर्चात अतिशय जटिल शस्त्रक्रिया करून दिली. बाळाचे वजन केवळ ४ किलो असल्याने बाळाच्या जीवितास धोका होता. परंतु या सर्व धोक्यांना पार करत अतिशय कौशल्याने डॉ. राहुल कारीमुंगी यांनी ही जटील शास्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून करण्यात येणाऱ्या जागतिक पातळीवरच्या उपचारांसाठी आता सोलापुरातच सर्व सुविधा उपलब्ध झाल्याचे या दोन घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी हे मोठे यश मानले जात आहे. या यशाबद्दल ए.सी. एस. हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत कौतुकांचा वर्षाव करत आहेत.
या पत्रकार परिषदेस डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ. दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.
रक्तवाहिनीतील रक्तपुरवठा झाला सुरळीत
सोलापुरातील एका रुग्णाला पोटदुखीचा त्रास होता. अन्न न पचणे, वारंवार उलट्या होणे अशाही समस्या भेडसावत होत्या. हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. स्वप्निल वाळके यांनी अँजिओग्राफी करून रक्तवाहिन्यांतील गुठळ्या शोधल्या. तसेच अँजिओप्लास्टी करून स्प्रिंग टाकून रक्तपुरवठा सुरळीत केला.
‘फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेन्शन’ प्रदर्शन
हृदय रोगावरील अतिप्रगत उपचारांसाठी भविष्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरिता भैय्या चौकातील एसीएस हॉस्पिटलतर्फे ‘फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेन्शन’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात अँजिओप्लास्टीचे तंत्रज्ञान, लेझर तंत्रज्ञान, रुग्णाचा रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी तसेच किचकट शस्त्रक्रियेवेळी उपयोगात येणारे इंपेला यंत्र, फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळ्या काढण्यासाठी तयार करण्यात आलेले इनारील यंत्र अशा जगभरात आगामी काळात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन एसीएस हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

























