किनवट / नांदेड : विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त किनवट शहरातील शिवाजी नगर भागात आज (ता.६) सकाळी १० वाजता अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, भावनिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंचापुढे उभी राहिलेली भीमअनुयायांची गर्दी आणि पुतळ्याजवळ ओसंडून वाहणारा भाविकांचा जनसागर यामुळे परिसर निळ्या विचारांनी निनादून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आ. भीमराजी केराम, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, माजी उपनगराध्यक्ष वेंकट गोपाळराव नेम्मानिवार, रिपाइं चे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, प्राचार्या शुभांगीताई ठमके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे, सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हाध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे, पीरिपा चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, मंडळ अध्यक्ष उमाकांत कऱ्हाळे पाटील, प्राचार्य आनंद भालेराव, दीपक ओंकार, ॲड. सम्राट सर्पे, निखिल कावळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवांना अभिवादन केले.
यावेळी महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुदायिक वंदना घेतली. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने परिसरात केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे भाविकांना कोणताही अडथळा आला नाही.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी नगरासह संपूर्ण शहरात भीमरूपी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन कृतज्ञतेने अभिवादन केले.
याच निमित्ताने “युवा पॅंथर” संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुणांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून समाजसेवेचा संदेश दिला. शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी आणि निळ्या प्रेरणेने भारलेला दिसत होता.


























