सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुजाता चौगुले, प्रा. सुकन्या जाधव, प्रा.अजित कुरे आणि विद्यार्थी प्रतिनिधींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका तथा रासेयो स्वयंसेविका कु. प्रियंका लोखंडे आणि कु. अमृता शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. विद्यार्थी मनोगता मध्ये सागर दळवे, अंश गांधी आणि कु. गायत्री कांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा आणि कार्यकर्तुत्वाचा गौरवास्पद आढावा सादर केला. रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांचे विचार हे विद्यार्थीदशेत वाचन संस्कृती रुजवून निरंतर तेवत ठेवण्याचा आशावाद व्यक्त केला.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी समस्त भारतीय समाज बांधवांसाठी महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज व्यवस्था आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण दैनंदिन आयुष्यात करावे जेणेकरून सामाजिक न्याय, बंधुता आणि समता या वाढीस लागतील असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचा शेवट हा रासेयो स्वयंसेविका कु. सानिका पोरे हिच्या आभार प्रदर्शनाने झाला.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दुपारच्या सत्रामध्ये प्रथम वर्षातील ८५ विद्यार्थ्यांनी श्रमदान केले व त्यानंतर महाविद्यालयात पुस्तकांच्या सामूहिक वाचन मोहिमेत सहभागी होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आदरांजली अर्पण केली. सदरील उपक्रमांच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तृतीय वर्षातील रासेयो स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



















