मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी लाखोचे अनुयायी जमले होते.बाबासाहेबाचा जयघोष करीत राज्याच्या कानकोपऱ्यातून अबाल वृद्ध भीमसैनिक याठिकाणी जमले आहेत. त्यांच्यासह राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले.
विविध माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शन,’ एक वही एक पेन’अभियान राबविण्यात आले. अभिवादनासाठी आलेल्या अन्वयांचे गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले,’भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, .
चैत्यभूमी येथे आयोजित शासकीय मानवंदनेसह अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेकर आणि आनंदराज आंबेडकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, खा. वर्षां गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ, अमित साटम, महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदींनी अभिवादन केले.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी राज्यपाल म्हणाले,’डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर आहेत. कठोर परिस्थितीतून शिकून त्यांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घराचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य बदलू शकतो हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला,
————-
पुढच्या महापरिनिर्वाणदिनी इंदू मिलवरील स्मारकाचे काम पूर्ण :मुख्यमंत्री
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचे नमूद करून त्यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम पुढच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्ण केले जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकर यांचे योगदान अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच शक्य झाले. समाजातील विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान त्यांनी देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली. जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले. आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केले.















