सोलापूर – माळढोक पक्षी अभयारण्यातील मौजे कोंडी येथील गट क्रमांक 166 मध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या मुरूम उपसा प्रकरणी वनविभागाने धडक कारवाई करत एक जेसीबी (MH 13 CS 0595) व एक टिपर (MH 25 AJ 0925) जप्त करून संबंधितांवर वनगुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजता करण्यात आली.
याप्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत खालील व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिलीप सौदागर ननवरे, रा. बीबी दारफळ टिपर मालक, यशवंत प्रवीण डोंगरे, रा. बाळे जेसीबी मालक, प्रेम धर्मा राठोड, रा. अकोले काटी टिपर चालक, यासिन मलिक तांबोळी, रा. बाळे जेसीबी चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी वनपरिमंडळ अधिकारी नान्नज-2 महावीर शेळके, वनरक्षक मारोती मुंडकर, सुधीर गवळी, बाबा साठे, सारंग म्हमाणे, सोमनाथ धारेराव तसेच वाहनचालक मारुती गवळी यांनी समन्वय साधत परिसराला वेढा घालून अवैधरीत्या मुरूम भरलेले टिपर व कार्यरत जेसीबी जप्त केले.
वनविभागाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे माळढोक अभयारण्यात वाढत्या अवैध मुरूम उपसा प्रकारांवर मोठा आळा बसण्यास मदत होणार आहे. या कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी नान्नज-1 गुरुदत्त दाभाडे, वनरक्षक कौशल्या बडूरे, सत्वशिला कांबळे, तसेच सुनील थोरात यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
ही कारवाई उपवनसंरक्षक विवेक होशिंग, विभागीय वनाधिकारी संदीप गवारे, तसेच सहाय्यक वनसंरक्षक जयश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोरे यांच्या गस्ती पथकाने केली.
















