सोलापूर – दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने मालिकेतील प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला भेट देत स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.४ ते १० डिसेंबर रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणारे हे विशेष भाग स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य, त्यांच्या भक्त कृपा, लीला आणि ब्रह्मा–विष्णू–महेश या त्रिदेवांच्या शक्तींचा एकत्रित अनुभव साकार करतील.दत्त म्हणजे उत्पत्ती,पालन आणि संहार यांचा परम संगम आणि या तीन शक्तींचं दिव्य प्रगटीकरण प्रेक्षकांना प्रथमच एका सलग कथेत आठवडाभर विस्ताराने अनुभवायला मिळणार आहे.
या विशेष अनुभवाबद्दल बोलताना अक्षय मुडावदकर म्हणाले,स्वामींचं दर्शन घेतल्यावर मनात अपरंपार समाधान आणि ऊर्जा मिळते.प्रेक्षकांकडून आणि स्वामी भक्तांकडून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळालाय.स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला की त्यांच्या कृपेचा स्पर्श नक्कीच लाभतो.
आज माझ्या हस्ते प्रसाद वितरण झालं, वातावरण संपूर्ण भक्तिमय होतं.योग्य दिवशी हा योग आला आणि मी अक्षरशः भावनेने भारावून गेलो.स्वामी समर्थ महाराजांचं सदैव ऋणी आहे, यंदा स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य आम्ही मालिकेत उलगडणार आहोत,त्या पार्श्वभूमीवर हा योग जुळून येणे अलौकिक गोष्ट आहे.
स्वामी भक्ती घरा-घरापर्यंत नेण्याचं माध्यम बनता आलं हेही भाग्यचं : प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेसाठी स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी अभिनय चाचणी दिल्यावर ही संधी मिळेल, असं वाटलं नव्हतं,त्यातच समर्थांच्या इच्छेनंचं सुसंधी मिळाली,ही भूमिका साकारणं प्रचंड आव्हानात्मक होतं, तरीही कलर्स मराठी च्या टीमनं घेतलेली मेहनत आणि कलर मराठीच्या प्रेक्षकांमुळे गेल्या ०५ वर्षात अखंडपणे १७०० भाग करण्यात यश आलं आहे.त्यात स्वामी भक्ती घरा-घरापर्यंत नेण्याचं माध्यम बनता आल्याचं छान वाटतं, असं प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर यांनी दत्त जयंतीदिनी अक्कलकोटला भेट देत स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.


















