मोडनिंब – टेट सक्ती, चुकीचा संचमान्यता शासन निर्णय, जुनी पेन्शन आणि इतर अनेक प्रश्नांमुळे शिक्षकांवर असे अन्यायकारक निर्णय होणे योग्य नाही. सरकारने या सर्व मुद्द्यांवर तातडीने फेरविचार करून न्याय देणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या योग्य हक्कांसाठी तसेच या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचे माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने सामूहिक रजा, शाळा बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा करण्यात आला होता. यावेळी आमदार अभिजीत पाटील सहभागी झाले होते.माढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे ८०० शिक्षक सामुहिक रजेवर गेले होते. तर ४४ जिल्हा परिषदेचे शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. तर माध्यमिकचे ४०० शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झाले.
सर्व संघटनेतून शिक्षक बंदमध्ये सहभागी झाल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष राजन सावंत यांनी दिली.शिक्षकांना टीईटी उत्तीर्णतेची सक्ती, जुनी पेन्शन योजना पुनस्थापित करणे, शिक्षण सेवक योजना रद्द करणे, शिक्षकेतर भरतीची रखडलेली प्रक्रिया सुरु करणे, आश्रमशाळेतील कत्राटी भरती रद्द करणे यासह इतर मागण्यांसाठी ३६ शिक्षक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत शुक्रवारी शाळा बंद आंदोलन केले. आता आम्ही राहू एक साथ, टीईटीवर करू खरचं मात,भगाओ टीईटी का टेन्शन और लेकर रहेंगे जुनी पेन्शन अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
विचार माझा पक्का टीईटीला देणार जोरदार धक्का नको नको टेट, लढाई आता थेट अशा प्रकारचे फलक दिसत होते. नवीन संच मान्यता रद्द करावी, टीईटी सक्तीची नको, थांबलेली पदोन्नती प्रक्रिया सुरु करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, सर्व विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, अशैक्षणिक कामे व अनाठायी उपक्रम बंद करावेत, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी, आश्रमशाळेतील कंत्राटी शिक्षक भरती रद्द करावी. कायमस्वरूपी भरती करावी.अशा विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी दुपारी दोनच्या सुमारास चार पुतळा येथून मोर्चाला सुरुवात केली. पार्क चौक, सिद्धेश्वर प्रशाला येथून मोर्चा पूनम गेटवर आला. तिथे त्याचे सभेत रुपांतर झाले. संघटनांच्या अध्यक्षांनी मार्गदर्शन करून मागण्या मांडल्या. पदोन्नती प्रक्रिया, कंत्राटी कर्मचारी भरती धोरणामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे सांगितले.
टेट सक्ती, चुकीचा संचमान्यता शासन निर्णय, जुनी पेन्शन आणि इतर अनेक प्रश्नांमुळे शिक्षकांवर असे अन्यायकारक निर्णय होणे योग्य नाही. सरकारने या सर्व मुद्द्यांवर तातडीने फेरविचार करून न्याय देणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या योग्य हक्कांसाठी तसेच या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.”
— आ. अभिजीत पाटील, माढा विधानसभा मतदारसंघ
माढा तालुका एकूण शाळा २९१
कार्यरत शिक्षक ८५१
संपात सहभागी शाळा २६०
संपात सहभागी शिक्षक- ८०७
माध्यमिक शाळा- १३५
संपात सहभागी १००
माध्यमिक शिक्षक ५५०
माध्यमिक शिक्षक संपात सहभागी ४००
शिक्षक बंदमध्ये सहभागी झाल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष राजन सावंत यांनी दिली.


















