बार्शी – महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या आवाहनानुसार, शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत व भुसार व्यापाऱ्यांनी लाक्षणिक एकदिवसीय संप पुकारला. या संपामुळे बार्शी बाजार समितीतील एक दिवसाची सुमारे दीड कोटींची उलाढाल ठप्प झाली.
संप असूनही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी घेतली. या बंदची कल्पना नसलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल आणल्यास, तो शेतमाल व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात उतरुन घेतला. मात्र खरेदी–विक्रीचे व्यवहार, लिलाव आणि सौदे दिवसभर स्थगित ठेवण्यात आले होते. भाजीपाला व कडबा बाजार वगळून इतर सर्व शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद राहिले.
बार्शी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे पुढील मुद्द्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. १) अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर 5% GST लागू झाल्याने राज्य सरकारला महसूल मिळत आहे, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा. २) २६ ऑगस्ट २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील अनिर्णित विषयांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावेत. ३) राष्ट्रीय बाजार समिती अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी कृती समितीसोबत त्वरित चर्चा करावी. ४) APMC कायद्यातील सुधारणाबाबत कृती समितीने सुचवलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करुन अंतिम निर्णय घ्यावा. ५)अन्नसुरक्षा व मानदे कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात आणि अनुचित कारवाईला प्रतिबंध करावा. ६) दिलेल्या आश्वासनानुसार APMC परवाने ऑनलाइन उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा राज्यातील व्यापारी परवाने नुतनीकरण करणार नाहीत.
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, बार्शीतील व्यापाऱ्यांनी आजचा लाक्षणिक बंद यशस्वीपणे पाळला.

















