कुर्डूवाडी – उपळवटे (ता. माढा) येथे कृषीनिष्ठ परिवार माढा तर्फे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. परिसरातील शेकडो द्राक्ष उत्पादकांनी उपस्थित राहून नवीन संशोधन, हवामान बदल, मृदा आरोग्य आणि आधुनिक बाग व्यवस्थापनावरील मौल्यवान माहितीचा लाभ घेतला.
शिबिराचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आर. जी. सोमकुंवर, माजी संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे आणि डॉ. अजयकुमार उपाध्याय, प्रमुख शास्त्रज्ञ (मृदा विभाग), राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी द्राक्ष बागेतील हवामान बदलाचे परिणाम, कार्बन सेवाक्षमता, मृदेमधील सूक्ष्मजीविक विविधता, निर्यातक्षम गुणवत्ता आणि स्मार्ट शेती तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विठ्ठलगंगा चेअरमन धनराज शिंदे यांनी विठ्ठलगंगा शेतकरी उत्पादक कंपनीने हाती घेतलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग लागवडी करिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मध्ये सहभाग घ्यावा याबाबत माहिती दिली. यावेळी प्रास्ताविक निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले व कृषीनिष्ठ परिवाराचे मार्गदर्शक नितीन कापसे यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना यापुढे ही अश्या प्रकारचे उपक्रम चालू ठेवू आवश्यक अश्या प्रकारचे कार्यक्रम प्रभावी पणे राबविण्यचे अभियान हाती घेऊ असे सांगून आभार व्यक्त केले.
शेतकऱ्यांना उत्पादन-स्थैर्य, मृदा आरोग्य सुधारणा आणि गुणवत्तावाढीसाठी कोणती पावले उचलावीत यावरही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. उपस्थित शेतकऱ्यांनी या ज्ञानसत्राचे मनापासून स्वागत केले व असे उपयुक्त उपक्रम सातत्याने राबवावेत अशी मागणीही व्यक्त केली.
कृषीनिष्ठ परिवार माढा तर्फे आयोजक नितिन कापसे सर्व शेतकऱ्यांचे तसेच तज्ज्ञांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी डॅा.सोमकुंवर, डॅा. उपाध्ये, विठ्ठलगंगा चे चेअरमन धनराज शिंदे निवृत्त जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती सुहास पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे, कृषीनिष्ठ चे नितीन कापसे, निमगाव चे मा. सरपंच रविंद्र शिंदे, प्रगतशील शेतकरी बालाजी गव्हाणे,पोपट खापरे, नानासाहेब देशमुख, जैन इरिगेशनचे किरण पाटील, गजानन कोटकर, बार्शी येथील शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी, माढा, पंढरपूर, बार्शी, करमाळा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते















