लोहारा / धाराशिव – लोहारा तालुक्यातील नागुर येथील यशोदाबाई पाटील हायस्कूल येथे जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ती केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री सुदर्शन जावळे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री मोहन शेवाळे व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक श्री प्रकाश लांडगे उपस्थित होते.
हा जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करत असताना समावेशीत शिक्षण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा व साहित्य इत्यादी बरोबरच या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी प्रथमेश घोडके याला मोफत वाटप करण्यात आलेल्या अलीम्को साहित्या मधील व्हीलचेअर व अध्ययन अध्यापन साहित्याचे किटच्या वापराबद्दल पालक व शिक्षक यांना विशेष शिक्षक श्री प्रकाश लांडगे यांनी सखोल माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना विशेष शिक्षक श्री प्रकाश लांडगे यांनी “हा दिवस फक्त औपचारिकता नाही, तर समाजातील दिव्यांग विद्यार्थ्याविषयी आदर, संवेदना आणि समानतेचा संदेश देणारा दिवस आहे”. हा सप्ताह संयुक्त राष्ट्राने १९९२ पासून साजरा करण्यास सुरुवात केली.
त्याचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना समान संधी देणे, समाजात त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे यासाठी समाजामध्ये संवेदनशीलते बरोबरच जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. दिव्यांगत्व ही कमतरता नाही, ती एक वेगळी क्षमता आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या मनात प्रचंड आत्मविश्वास, क्षमता आणि जिद्द असते, मर्यादा शरीरात असतात, मनात नाहीत असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये श्री सुदर्शन जावळे यांनी
आपण हसतमुखाने, समजून घेऊन आणि सन्मानाने हात पुढे केला तर एक सक्षम, संवेदनशील आणि सर्वसमावेशक समाज उभा राहू शकतो. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद सर्वांनाच दिव्यांगासाठी काम करण्याचे प्रोत्साहन देऊन गेला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी जाधव, सहशिक्षक अनिल गाडेकर, दत्ता राठोड, व्यंकट शिंदे तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्यंकट शिंदे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक तानाजी जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.






















