कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वर पिंडीवर बर्फ जमा होण्याचा प्रकार बनावट असल्याचे समोर आल्यामुळं राज्यभरातील भाविकांसह स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल होवून २४ तास उलटूनही अद्याप पोलिसांनी संशयितांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं या प्रकरणाचे गौडबंगाल काय आहे. अशी चर्चा सुरू आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी हे शहरातील असून अद्याप पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले कसे नाही. याबाबतही शंका उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षी ३० जून २०२२ रोजी पहाटेला पुजारी सुशांत तुंगार यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह शिवपिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. त्यावर देशविदेशातून भाविकांचे येथे लक्ष वेधले गेले. देवस्थान ट्रस्टचे चेअरमन न्या. विकास कुलकर्णी यांनी तातडीने तीन विश्वस्त सदस्यांची समिती नेमली. यामध्ये भाविकांचे प्रतिनिधी अॅड. पंकज भुतडा, पूजक प्रतिनिधी डॉ. सत्यप्रिय शुक्ल, पुरोहित प्रतिनिधी प्रशांत गायधनी यांचा समावेश होता. त्यांनी मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. या तपासणीतून बर्फ तयार झाल्याचा प्रकार बनावट असून तो सुशांत तुंगार यांनी केल्याचा आणि त्याचे छायाचित्रण आकाश तुंगार व उल्हास तुंगार यांनी केल्याचा अहवाल सादर केला.
याबाबत त्र्यंबक पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे यांनी तपास केला. मात्र जवळपास सहा महिने हे प्रकरण बासणात गुंडाळले गेले. त्यामुळे अनेकांना त्याचे विस्मरणही झाले. तथापि जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांनी कारभार हाती घेतल्यानंतर पुन्हा या तपासाला चालना देण्यात आली. हवामान खात्याचा अहवाल मागविण्यात आला. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रशासकीय अधिकारी रवी जाधव यांनी फिर्याद दाखल केली.
बर्फ प्रकरणावरुन गुरुवारी शहरात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. संशयित आरोपींना अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आले नाही. दरम्यान, पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत पुजारी असा उल्लेख आहे. त्रंबकेश्वर येथील धार्मिक विधींसाठी देश-विदेशातून भाविक पुरोहितांकडे म्हणजेच ब्राह्मणांकडे येतात. पुजारी म्हणजे पुरोहित असा गैरसमज झाल्याने येथील पुरोहितांकडे विविध प्रांतातील भक्तांकडून चौकशी सुरू झाली आहे. याबाबत पुरोहित समाजाचे अध्यक्ष मनोज थेटे आणि विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी पुजारी म्हणजे पुरोहित नाही व त्र्यंबकेश्वर येथे हे दोन घटन वेगळे आहेत, अशी जाहिर सुचना केली आहे.
अंनिसने उपस्थित केला सवाल
शिवलिंगावर बर्फ जमा होणे हे षडयंत्र असल्याचा अंनिसने केलेला दावा खरा ठरला. मात्र प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे असतानाही हा गुन्हा दाखल होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी का लागला? असा प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे. तसेच बाहेरून बर्फ आणून पिंडींवर ठेवणाऱ्या व भाविकांच्या श्रद्धांशी खेळणाऱ्या पुजाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला गेला असला तरी, जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावावेत, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर यांना निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व त्र्यंबकेश्वर शहर कार्याध्यक्ष संजय हरळे, दिलीप काळे यांनी केली आहे.