पोखरापूर दि.10 – केंद्रीय नवोदय विद्यालय पोखरापूर ता. मोहोळ येथील विद्यार्थी क्रांतीकुमार सुरेंद्रर पाटी यांची तामिळनाडू सरकारने कोईमतूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नुकतीच निवड केली.कोइमतूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी क्रांतीकुमार पाटी हे ३२ वर्षीय युवक असून तामिळनाडू मधील सर्वात कमी वयाचे आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
क्रांतीकुमार सुरेंद्र पाटी यांचे १२वी सायन्स पर्यंतचे शिक्षण पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालय (सोलापूर) येथे झाले.
नंतर ते महाराष्ट्र काँमर्स काँलेज पुणे येथे शिक्षण घेवून सन २०११ मध्ये चाँर्टर्ड अंकौंटंट परीक्षा उत्तीर्ण झाले. सन २०१५ मध्ये उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. सन २०१७ मध्ये असिस्टंट सेक्रेटरी या पदावर नियुक्ती झाली.नंतर ते ‘कर विभागात ‘ सहआयुक्त पदावर कार्यरत होते.त्यांनी त्यांच्या कालावधीत कौशल्य दाखवून शासनाच्या तिजोरीत कर रुपाने निधी वाढवून आदर्श निर्माण केला. त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांचे मराठी, तेलगू, इंग्रजी, हिंदी व फ्रेंच भाषेवर प्रभुत्व आहे.तो एक हुशार,नम्र, संयमी व जिज्ञासू वृत्तीचा असल्याने नेत्रदीपक कौशल्य दाखवून त्याने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
अशी प्रतिक्रिया क्रांतीकुमार पाटी यांचे आई वडिलांनी व्यक्त केली आहे. क्रांतीकुमार पाटी यांचे वडील सुरेंद्र पाटी हे नवोदय विद्यालय पोखरापूर येथे माजी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.त्यांनी नवोदय विद्यालयात उत्कृष्टपणे प्रशासकीय व अध्यापनाचे कार्य करून नवोदय विद्यालयाचा सी.बी.एस.सी. बोर्ड परीक्षा (१०वी व१२वी) शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली होती. क्रांतीकुमार पाटी यांची तामिळनाडू राज्यात कोइमतूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याने नवोदय विद्यालय पोखरापूर येथे प्राचार्य संजय कोठाडी, केंद्रीय नवोदय समिती पुणे विभागीय सहायक आयुक्त डाँ. अंकुश सावंत, जि. प. सोलापूर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, जगदंबा विद्यालय पोखरापूरचे माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे, प्राचार्य एस बी बाबर,यांनी अभिनंदन केले आहे.