मंगळवेढा – तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता प्रति टन ३ हजार रुपये जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून तालुक्यातील सर्व कारखान्यांची ऊस गव्हाण बंद ठेवण्यात येईल, असा कडक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. जिल्हाभर उसाच्या दरासाठी आंदोलन पेटले असून सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पहिला हप्ता ३ हजार रुपयांनी जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी ठामपणे उभे राहिले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावर चेअरमन पाटील यांनी रविवारी संचालक मंडळाची बैठक असून, या बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दामाजीसह तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी रविवारपर्यंत ऊस दर जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन मंगळवेढा तालुक्यातील सर्व कारखान्यांची ऊस गव्हाण दर जाहीर होईपर्यंत बंद ठेवू, असा ठोस इशारा दिला.
आंदोलनावेळी युवराज घुले, श्रीमंत केदार, अनिल बिराजदार, आबा खांडेकर, शंकर संगशेट्टी, पांडुरंग बाबर, रोहित भोसले, हरी खांडेकर, मल्लिकार्जुन देवपुरे, विजयकुमार पाटील, गजानन बंडाई, रणजीत पवार, विनायक कोळी, आप्पासाहेब पाटील, सिद्धराम होटगी, बसवराज नांगरे, नानासो मलगुंडे, शिवराज पाटील, आप्पासो चौगुले, लिंगप्पा सोनगे, अनगोंडा पुजारी, संजय रजपूत, किशोर दत्तू, पप्पू दत्तू, विनायक शेजाळ यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर उसाच्या दरासाठी ठिय्या आंदोलन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी दिसत आहे – छाया विजय भगरे मंगळवेढा.

























