सोलापूर – अल्पसंख्यांक बहुल भागातील मूलभूत नागरी सुविधांना भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील जन्नतुल फिरदोस कब्रस्तानसाठी रस्ता काम व सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत उभारणीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये, असा एकूण ५० लाख रुपयांचा निधी सन २०२५–२६ अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्राकरिता क्षेत्रविकास या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.
प्रभागाचे माजी नगरसेवक किसन जाधव तसेच नगरसेवक नागेश गायकवाड यांनी अल्पसंख्यांक बांधवांना दफनविधीच्या वेळी होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील गैरसोय आणि कब्रस्तानच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सातत्याने शासनदरबारी प्रभावीपणे मांडत ठोस पाठपुरावा केला होता. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून जन्नतुल फिरदोस कब्रस्तान येथे ५० लाखांचे सांस्कृतिक भवन मंजूर होऊन त्याचे भूमिपूजन नजीब मुल्ला यांच्या हस्ते पार पडले होते. त्याच भूमिपूजन सोहळ्यात किसन जाधव यांनी रस्ता आणि सुरक्षा भिंतीसाठी मागणी मांडली होती. त्या मागणीची दखल घेत नजीब मुल्ला यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिफारस केली होती. त्याचा परिणाम म्हणून आज हा निधी प्रत्यक्षात मंजूर झाला आहे. लवकरच या कामाचे प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किसन जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेस हाफिज सनामूल्ला, तय्यब अली, आसिफ शेख, महंमद आळगी, असलम इनामदार, महबूब कुडले, शहानवाज शेख, सैपन शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख, फिरोज पठाण आदींची उपस्थिती होती.


























