पंढरपूर – उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण केले, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा ब्रँड संपल्यात जमा झाला, अशी घणाघाती टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणताही फरक पडणार नाही. मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असे भाकितही विखे पाटील यांनी वर्तविले.
मंत्री विखे पाटील सोमवारी (ता.१५) श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
मंत्री विखे पाटील म्हणाले, मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील दहा वर्षात मोठे काम केले आहे. मुंबईकरांना त्याची जाणीव आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये मुंबईकरांनी भाजप- शिवसेनेला साथ दिली आहे. या निवडणुकीत देखील भाजप शिवसेना महायुतीचा महापौर होईल, यात शंका नाही. मुंबईतील पराभवाच्या भीतीनेच दोन ठाकरे एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्रीकरणाचा कोणताही फरक पडणार नाही. मुंबईतील जनता भावनिक राजकारणाला कंटाळून गेली आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण केले, त्याच वेळी ठाकरे यांचा हिंदुत्वाचा ब्रँड इतिहासजमा झाला आहे.
——————–
विठुरायाला विखेंकडून साकडे
राज्य दुष्काळमुक्त राहावे आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत विठ्ठलाने महायुतीला आशीर्वाद द्यावेत, असे आपण विठुरायाला साकडे घातल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे नेते प्रकाश पाटील, प्रणव परिचारक आदी उपस्थित होते.
————————-
पृथ्वीराज चव्हाण म्हणजे संपलेली आवृत्ती
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला. २०१४ साली नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली, ती तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनावर घेतली. त्यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करून टाकला. जे त्यांच्या मलकापूर नगरपालिका निवडणुकीत पॅनेल उभे करू शकले नाहीत, ते फक्त शिळ्या कढीला ऊत आणून आपले राजकीय अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. कराड नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, अशी परिस्थिती आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणजे संपलेली आवृत्ती आहे. त्यामुळे चव्हाण यांनी यापुढे राजकीय सत्तांतराविषयी भाष्य करू नये, असा उपरोधिक टोलाही विखे पाटील यांनी लगावला.
—————–
फोटोओळी :
पंढरपूर : श्री विठ्ठलाचे सहकुटुंब दर्शन घेताना राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे कुटुंबीय. यावेळी उपस्थित प्रकाश पाटील, प्रणव परिचारक, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर तसेच मंदिर समितीचे अधिकारी आदी.

























