बीड : १८ ते २१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ६१ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बीड शहर पूर्णपणे सज्ज झाले असून, आयोजकांकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.
स्पर्धा स्थळ असलेल्या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात एकाच वेळी सुरळीत सामने पार पडावेत यासाठी ४ स्वतंत्र क्रीडांगणे सज्ज करण्यात येत आहेत. मापदंडानुसार आखणी, दर्जेदार मैदाने व योग्य प्रकाशयोजना यामुळे खेळाडूंना सर्वोत्तम खेळाचे वातावरण उपलब्ध होणार आहे.
राज्यभरातून येणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी सुरक्षित व प्रशस्त प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येत असून, स्पर्धेच्या चारही दिवसांत मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. थरारक व दर्जेदार सामने पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.
खेळाडू, प्रशिक्षक व अधिकाऱ्यांसाठी स्वच्छ, पौष्टिक आणि वेळेवर भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरातील ये-जा सुलभ व्हावी यासाठी वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था व समन्वय पथके तैनात करण्यात आली आहेत.
या स्पर्धेमुळे केवळ उत्कृष्ट खेळाडूंची निवडच होणार नाही, तर बीडच्या क्रीडा व्यवस्थापन क्षमतेचे प्रभावी दर्शन घडेल, असा विश्वास शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक प्रा. जनार्दन शेळके यांनी व्यक्त केला.
प्रा. जे. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष ऋषिकेश शेळके, उपाध्यक्ष रमेशभाऊ शिंदे, सचिव विजय जाहेर, राज्य प्रसिद्धी समिती सदस्य प्रा. राजेंद्र बरकसे, अविशांत कुमकर, तसेच वर्षा कच्छवा (सह सचिवमहाराष्ट्र खो-खो असोसिएशन),योगेश सोळसे, मनोज जोगदंड, कैलास गवते, अनिल शेळके, माधव जायगुडे, बंडू घोरड, अमोल सांगुळे, प्रफुल्ल हाटवटे, नितीन फुटवाड, रमेश पिसाळ, सुधीर हजारे, नितीन येळवे, अंकुश गायकवाड, संदीप हांगे, बापू तारुकर, ठोकरे, राऊत, घरत यादव, मुंजाराम निरडे, सोमनाथ मंडलिक, छत्रभूज ढेंबरे आदी कार्यकर्ते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.


























