सोलापूर : चलन नियंत्रण, बँकिंग प्रणालीचे नियमन आणि आर्थिक विकासाला दिशा देणारी आरबीआय ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा कणा आहे. महिलांचा आरबीआयमधील सहभाग वाढला तर देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळू शकते. निर्णयप्रक्रियेत महिलांचा दृष्टिकोन हा अधिक संवेदनशील, समतोल आणि दूरगामी असतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी बँकिंग व आर्थिक क्षेत्रात करिअर घडवावे, असे प्रतिपादन आरबीआयच्या विभागीय शाखेच्या उपमहाव्यवस्थापक गीता एस. नायर यांनी केले.
सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअरविषयक संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे होते. यावेळी व्यवस्थापक भाग्यश्री बढे, सहाय्यक व्यवस्थापक उर्मिला यादव उपस्थित होत्या.
यावेळी भाग्यश्री बढे यांनी आरबीआयमधील भरती प्रक्रिया, पात्रता, अभ्यासक्रम आणि निवड पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष सुविधा, सुरक्षित कार्य वातावरण, प्रसूती रजा, आरोग्य सुविधा, प्रशिक्षण संधी आणि करिअर प्रगतीच्या विविध शक्यता याविषयी त्यांनी माहिती दिली. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर आरबीआय परीक्षा उत्तीर्ण होणे निश्चितच शक्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उर्मिला यादव यांनी आरबीआयमधील आपले वैयक्तिक अनुभव विद्यार्थिनींसमोर मांडले. त्या दिव्यांग असूनही आरबीआयमध्ये मिळणारे सहकार्य, सकारात्मक वातावरण आणि सहकाऱ्यांकडून मिळणारी मदत याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केले.
आरबीआयमध्ये क्षमतेला महत्त्व दिले जाते. शारीरिक मर्यादा यशाच्या आड येत नाहीत असे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास बाळगण्याचा संदेश दिला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, बँकिंग क्षेत्र हे आजच्या काळातील स्थिर, प्रतिष्ठित आणि सेवााभिमुख करिअरचे उत्तम माध्यम आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इंदुमती गंगन्नवर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मृदुला मोहोळकर यांनी केले. तर आभार प्रा. अरुणा कोडम यांनी मानले.
फोटो ओळ: आरबीआयच्या विभागीय शाखेच्या उपमहाव्यवस्थापक गीता एस. नायर यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे


























