सोलापूर – भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकशाही बळकट करावी. सांप्रदायिक प्रचाराला आळा घालण्यासाठी लाल सैनिक पेटून उठले पाहिजेत. सोलापूरच्या जनतेला खोटी विकासाची स्वप्ने विकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्धार करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
भारत कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ची सर्वसाधारण सभा बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, दत्तनगर येथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम यांनी भूषवले. मंचावर माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, ॲड. अनिल वासम उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या एक महिन्याचे निवृत्तीवेतन ७१ हजार रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाचे जिल्हा सचिव मेजर कॉम्रेड युसुफ शेख यांच्याकडे सुपूर्द केले.
तसेच, कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कर्मचारी व प्रभारी यांनी १ लाख रुपये, दत्तनगर कार्यालयातील कार्यकर्ते व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी १ लाख रुपये, तर माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी व त्यांच्या कुटुंबीयांनी २५ हजार रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाकडे दिले.
सभेचे प्रास्ताविक पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड मेजर युसुफ शेख यांनी केले. ते म्हणाले, सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व महायुतीतील घटक पक्षांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधला आहे. त्याच धर्तीवर माकपचे लाल सैनिकही सज्ज झाले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभाराला मूठमाती देण्याची ही योग्य वेळ आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत असतो. हा संघर्ष आर्थिक-सामाजिक प्रश्नांपुरता मर्यादित न ठेवता सत्ताकेंद्रात हस्तक्षेप करण्यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक निधी संकलन मोहीम राबवली जात आहे, ज्याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज राहावेत. भांडवलशाही प्रवृत्ती व सत्ताधाऱ्यांच्या अवगुणांना मातीमोल करून लोकशाही मार्गाने मुकाबला करूया, असे आवाहन माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य एम. एच. शेख यांनी केले.


























