सोलापूर : शालेय जीवनातील गमतीदार प्रसंग, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचे रंगतदार किस्से आणि शासकीय नोकरीतील, वैयक्तिक आयुष्यातील गमती जमती सांगत डॉ. रवींद्र तांबोळी (नांदेड) यांनी गुरुवारी ‘विनोदाचे आत्मपर अंतरंग’ उलगडले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर आयोजित शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचे.
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात डॉ. रवींद्र तांबोळी यांनी ‘विनोदाचे आत्मपर अंतरंग’ या विषयावर मनोगत व्यक्त करत सोलापूरकरांना पोट धरून हसविले. व्याख्यानमालेचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. प्रारंभी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी व्यासपीठावर मसापाच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, कार्याध्यक्ष किशोर चंडक, प्रमुख कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर, प्रा. भीमगोंडा पाटील उपस्थित होते. यावेळी मागीलवर्षीच्या व्याख्यानमालेत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते सुनेत्रा पंडित, रामकृष्ण अघोर, शैलेंद्र पाटील यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ रवींद्र तांबोळी म्हणाले, हसणे ही मनुष्याला मिळालेली निसर्ग वृत्ती आहे. हसण्यामुळे दुःखावर फुंकर घातली जाते. इतरांवर विनोद करण्यापेक्षा स्वतःवर विनोद करणे हे अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावेळी त्यांनी अभिनेत्री नीतू सिंग यांना लिहिलेले पत्र, वडिलांच्या कादंबरीवर निघालेला चित्रपट आदी किस्से ऐकवत सोलापूरकरांचे मनोरंजन केले. तसेच स्वलिखित पुस्तकातील काही भाग वाचून दाखवले.
कवी गोविंद काळे यांनी परिचय करून दिला. मसापचे कार्याध्यक्ष किशोर चंडक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भीमगोंडा पाटील यांनी सूत्रसंचालन तर बदीउज्जम्मा बिराजदार यांनी आभार प्रदर्शन केले.
शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेत आज
शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेत आज (शुक्रवारी) डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी (पुणे) हे ‘दवणा’ या विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्यावर अभिवाचन व विवेचनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सोलापूरकरांनी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी ठीक ६ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे कार्यवाह किशोर चंडक यांनी केले आहे.


























