शहरातील पंचगंगा नदी घाटावर स्वच्छ्ता मोहीम सुरू असताना राष्ट्र सेवा दल यांना बरेच आधार कार्ड आणि काही कागदपत्रांनी भरलेलं एक पोतं सापडलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने रेशन कार्डने भरलेलं पोतंही मिळून आलं होतं. विशेष म्हणजे यामधील आधार कार्ड हे ओरिजनल असल्याने याचा कुठे गैरवापर करण्यात आला आहे का? याची शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. आधार कार्डने भरलेलं पोतं आढळले असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत सर्व आधार कार्ड ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी रेशन कार्डने भरलेलं पोतं नदीत टाकल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा आधार कार्डने भरलेलं एक पोतं पुन्हा मिळून आलं आहे. काल रविवारी नदी घाटावर राष्ट्र सेवा दल यांच्याकडून घाट स्वच्छता मोहीम सुरू असताना नदी काठावर एक पोतं तरंगत असल्याचं युवकांना दिसून आलं. हे पोतं बाहेर काढून उघडलं असता पोत्यामध्ये बरेच आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आले.
अशी महत्वाची कागदपत्रे पोत्यात भरून नदीत टाकल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळताच शिवाजीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पथकासह धाव घेतली. चिखलमय पोत्यातून आधार कार्ड बाहेर काढून त्याचा पंचनामा केला. पोत्यात लॅमिनेशन केलेले आधार कार्ड सापडल्यामुळे पोलिसही काही काळ चक्रावले. यावेळी घटनास्थळी काही आधार कार्ड बनवणाऱ्या केंद्र प्रमुखांना बोलावले असता त्यांनी आधार कार्डची तपासणी केली असता यामध्ये काही कार्ड बोगस असल्याचे तर काही आधार कार्ड ओरिजनल असल्याचं त्यांनी सांगितलं.
सर्व आधार कार्ड शहरातील जवाहरनगर, भोने माळ, कोरोची, कबनूर आदी भागातील विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची असल्याचे आढळून आले. यापैकी काहींशी संपर्क करण्यात आला. अनेकांनी खरी आधार कार्ड घरीच असल्याचे पोलिसांना सांगितले. या आधार कार्डमध्ये छेडछाड करून निराधार लोकांना आधार कार्ड मध्ये वयोमर्यादा वाढवून देऊन हे बोगस आधार कार्ड काढण्यात आले असल्याची शंका आता निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, आता शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून ही सर्व आधार कार्ड जप्त केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.