मुदखेड / नांदेड – मुदखेड नगरपरिषदेत तब्बल २० वर्षानंतर भाजपाचे कमळ फुलले असून नगराध्यक्ष पदासह १४ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवासोबत खा. चव्हाण यांच्या ‘अशोक’पर्वावर शिक्कामोर्तब झाला आहे.
मुदखेड नगरपरिषदेवर गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्ष पदी अपक्ष मुजीब जहागीरदार निवडून आले होते. यानंतर मध्यंतरीच्या काळात भाजपात पक्ष प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खा. अशोक चव्हाण यांनी केलेला राजकीय पक्ष प्रवेश राजकीय भूकंप समजला जात होता. यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बालेकिल्ला शाबीत ठेवला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा पणाला लावून श्रीजया चव्हाण यांना आमदार केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वर्चस्व स्थापन करण्यासाठी खा. अशोक चव्हाण यांनी संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता.
मुदखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सौ.विश्रांती माधव कदम यांना ६८८९ तर काँग्रेस उमेदवार सौ.शीला राजबहादुर कोत्तावार यांना ५१६२ मते मिळाली. यामध्ये भाजपच्या विश्रांती कदम यांचा १७२७ मतांनी विजयी झाला शिला कोत्तावार यांचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपाचे १४, काँग्रेसचे ४ आणि एम आय एमचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे खा. अशोक चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले असून अशोक पर्वाने काँग्रेसची वाताहत झाली आहे.


























