किनवट / नांदेड : किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापित सत्तेला जोरदार धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुजाता येंड्रलवार यांनी भाजपाच्या सौ. पुष्पा आनंद मच्छेवार यांचा ३९९६ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. येंड्रलवार यांना १०,४७७ मते तर मच्छेवार यांना ६,४८१ मते मिळाली. इतर पक्षांना विशेष यश मिळू शकले नाही.
एकूण १० प्रभागांतील २१ नगरसेवकांच्या निवडीसाठी ही निवडणूक पार पडली. प्रभाग क्रमांक १ (अ) मध्ये भाजपाचे संतोष म्हरसकोल्हे यांनी केवळ १३ मतांनी विजय मिळवला. १ (ब) मध्ये अपक्ष प्रिती धिरज नेम्मानिवार यांनी ३८३ मतांच्या भक्कम फरकाने बाजी मारली. प्रभाग २ (अ) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या अश्विनी जागर्लावार यांनी ३३९ मतांनी विजय मिळवला. प्रभाग ३ (अ) मध्ये शिवसेना (उ.बा.ठा.)च्या निलोफर भाटी विजयी झाल्या, तर ३ (ब) मध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत श्रीराम नेम्मानिवार यांनी भाजपाच्या फेरोज तंवर यांचा केवळ २ मतांनी पराभव केला; यासाठी दुबार मतमोजणीही करण्यात आली.
प्रभाग ४ (अ) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय नगराळे तर ४ (ब) मध्ये शेख नुरसबा शेख मुकद्दर विजयी ठरल्या. प्रभाग ५ (अ) मध्ये अपक्ष चंद्रशेखर नेम्मानिवार यांनी विजय मिळवला. प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी (श.प.)चे प्रविण राठोड यांनी ५९१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. ६ (ब) मध्ये भाजपाच्या निकिता आयनेनिवार, तर दुसऱ्या ६ (ब) जागेवर भाजपाच्या सरोजनी ओद्दीवार यांनी अल्प फरकाने विजय मिळवला. अत्यंत हायव्होल्टेज मानल्या जाणाऱ्या प्रभाग ७ मध्ये भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास किशनराव नेम्मानिवार विजयी झाले. प्रभाग ८ (अ) मध्ये शिवसेना (उ.बा.ठा.)च्या गंगाबाई कोल्हे यांनी माजी नगरसेविका अनिता क्यातमवार यांचा ३० मतांनी पराभव केला, तर ८ (ब) मध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुरज सातुरवार यांनी ७९६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. प्रभाग ९ (अ) मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या शेख सादिका तर ९ (ब) मध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या बेग नईम मिर्झा यांनी माजी नगराध्यक्ष साजिद खान यांचा १४ मतांनी पराभव करत धक्कादायक निकाल दिला.
प्रभाग १० (अ) मध्ये माजी नगराध्यक्ष अभय महाजन तर १० (ब) मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या गुलबख्त खान विजयी ठरल्या. १० (क) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खान जरीना साजिद यांनी विजय मिळवला.एकूण निकाल पाहता किनवट नगर परिषदेत सत्ताबदल स्पष्ट झाला असून भाजपला मोठा राजकीय धक्का, तर शिवसेना (उ.बा.ठा.) सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी लक्षणीय कामगिरी केली आहे.


























