वाळूज – मोहोळ तालुक्यातील वाळूज परिसरात सध्या थंडीची लाट पसरली आहे सलग तीन दिवस किमान तापमानाचा पारा घटल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. या तीन दिवसांमध्ये किमान तापमानासोबत कमाल तापमानातही घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रचंड गारठा निर्माण झाला आहे .जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातील तापमानाचा पारा १२ अंशाच्या खाली घसरला असून ग्रामीण परिसरात कडाक्याची थंडी वाढत चालल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे.
हवेत गारवा असल्याने दिवसभर थंडी टिकून असल्याने दुपारच्या सुमारासही वातावरणात गारवा जाणवत आहे. थंडीचा कडाका वाढला आहे. झटपट शेकोटी पेटवा लागलाय खोकला अशी अवस्था झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक स्वेटर, कानटोपी, जॅकेट्सचा. उबदार कपड्यांचा वापर करत. नागरिक रस्त्यावर शेकाटीची ऊब घेत आहेत. सायंकाळपासूनच ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. पहाटे किमान तापमानात घट होत दाट धुक्याची चादर पसरली आहे.सकाळी शेतकरी, दूध विक्रेते, भाजी विक्रेते,विद्यार्थी यांना या थंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. दुसरीकडे गहू, हरभरा यांसारख्या रब्बी पिकांसाठी ही थंडी पोषक आहे.
थंडीचा जोर वाढल्याने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखी, कफ यासारखे त्रास होऊ लागले आहेत. थंडी वाढल्यानंतर मानवी आरोग्यासाठी घ्यायची काळजी याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय थंडीमध्ये शेती पिकांची काळजी, पशुधनाची काळजी या बाबतही मार्गदर्शक सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिल्या जात आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात थंडी कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
थंडीमध्ये आरोग्याची काळजी घ्या-
• सकाळी व रात्री उबदार कपडे घाला, कान व नाक झाका.
• थंड पाणी टाळा, कोमट पाणी प्या.
• खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• लहान मुले व ज्येष्ठांनी पहाटे बाहेर जाणे टाळावे.
• धुक्यात व थंडीत अचानक तापमान बदल टाळा.
• अंगात थंडी शिरल्यास विश्रांती घ्या.
• आजार अंगावर काढू नका; वेळीच उपचार घ्या.
-जिल्हा प्रशासन / आरोग्य विभाग
मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे नदीकाठावर विद्यार्थी शाळेत जाताना थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीची ऊब घेताना दिसून येत आहेत.

























