नायगांव – तालुक्यातील नरसी येथील रहिवासी तसेच दैनिक प्रजावाणीचे पत्रकार सुभाष संभाजी पेरकेवार (नरसीकर) यांचे सोमवारी (दि. २२ डिसेंबर २०२५) सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने नरसी सह नायगांव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतातील सततच्या नापिकीमुळे निर्माण झालेल्या तणावाची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणे बाकी असून संबंधित यंत्रणांकडून माहिती घेण्यात येत आहे.
स्व. पेरकेवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, आई-वडील, भाऊ व बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नरसी येथील स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी ५ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभाष पेरकेवार हे मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. पत्रकारितेसोबतच सामाजिक प्रश्नांबाबत त्यांची नेहमीच तळमळ असायची. त्यांच्या आकस्मिक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अंत्यविधीस गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























