पंढरपूर – ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय गोवा यांचे वतीने रविवारी (दि. २१) रोजी पंढरपूर येथील क्षेत्र चंद्रभागा तिरी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी महर्षी वाल्मीकी संघटना पंढरपूरचे अध्यक्ष तसेच आदिवासी कल्याण समितीचे सर्वेसर्वा गणेश अंकुशराव हे उपस्थित होते. त्यांनीवारकरी संस्थेचे अध्यक्ष देवानंद नाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करत इथे या मंडळींना कोणतीही अडचण आली तर आम्ही ती दूर करू व हवं ते सहकार्य करु असं अभिवचन दिलं.
यावेळी बोलताना गणेश अंकुशराव म्हणाले की, चंद्रभागेच्या पात्रात चिंध्या, कपडे, चपला अशी भयंकर घाण आहे, हे घाणीचं साम्राज्य पाहून इथं आलेल्या वारकरी भाविकांचं पंढरपुर बाबतचं मत कलुषित होत आहे व या घाणीबाबत प्रचंड नाराजीचा सूर ही उमटत आहे, परंतु मंदिर समिती लाखो रुपये खर्च करुन चंद्रभागा स्वच्छतेसाठी टेंडर काढते पण स्वच्छता का होत नाही? गोव्यासारख्या परराज्यातील वारकरी संघटना इथं येऊन चंद्रभागा स्वच्छ करतात मग महाराष्ट्रातील वारकरी संघटना काय करतात? असा सवाल उपस्थित करत गणेश अंकुशराव यांनी महाराष्ट्रातील विविध वारकरी संघटनांनी सुध्दा चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी पुढे यावं असं आवाहन केलं.


























