माहूर / नांदेड – माहूर तालुक्यातील वाई बाजार जवळील वाघाई टेकडी जवळ धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर उभ्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलवरील तिघांपैकी दोन जण जागेवरच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची अत्यंत ह्रदयद्रावक घटना दि.२३ रोजी दुपारी ०४वाजता घडली आहे.
वाघाई टेकडी जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बीकेसी कंपनीच्या ट्रक क्रमांक AP39,ux,6876 मोटर सायकल क्रमांक.m h 26,f 4238 ची जोरदार धडक बसली.
मोटरसायकलवर बसलेले आसोली साईनगर येथील तरुण विट्ठल राठोड वय ३० वर्ष आणि अर्जुन विठ्ठल राठोड वय 10 वर्ष सोबत एक आंध्रप्रदेशातील वयोवृद्ध अंदाजे ६५ वर्ष हे तिघे आसोली ते लसनवाडी येथे जात असताना वाघाई टेकडी जवळ अचानकपणे मोटरसायकल ट्रकवर मागून जाऊन आदळली. झालेल्या धडकेत दोघांच्या डोक्याला, तोंडाला व छातीला जबर मार लागल्याने दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर दहा वर्षीय अर्जुन हा चिमुकला गंभीर जखमी झाला.
घटना कळताच सिंदखेडचे सपोनी रमेश जाधवर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयता सह जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे डॉ.मंगेश नागरगोजे यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर जखमी अर्जुनवर उपचार सुरू आहेत. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


























