सोलापूर – माळशिरस बायपास महामार्गावर गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांचाच श्वास रोखून धरला होता. एका भरधाव कारला भीषण अपघात होऊन कारने अचानक पेट घेतला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मृत्यूच्या दाढेतून दोन महसूल अधिकाऱ्यांचे प्राण वाचले आहेत. अवघ्या काही क्षणांचा उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि. १९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास माळशिरस बायपास रोडवर घडली. महसूल विभागातील अधिकारी समाधान शिंदे आणि नीलेश कुंभार हे आपल्या कारने प्रवास करत होते. बायपास रोडवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली. कार उलटताच इंजिनमधून धूर येऊ लागला आणि क्षणार्धात कारने पेट घेतला.
दोन तरुणांनी मारली जीवाची बाजी अपघात झाला त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या शिवाजी वाघमोडे आणि सिद्धेश्वर जाधव या दोन तरुणांनी हा प्रसंग पाहिला. जळती कार पाहून भीतीपोटी अनेकजण लांब उभे होते, पण या दोघांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तत्काळ गाडीकडे धाव घेतली.
कारचे दरवाजे लॉक झाल्यामुळे किंवा जाम झाल्यामुळे आत अडकलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर पडणे कठीण झाले होते. आगीच्या ज्वाळा वाढत असतानाच शिवाजी आणि सिद्धेश्वर यांनी जिवाची बाजी लावून कारची काच फोडली आणि दोन्ही अधिकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. अधिकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सर्वत्र होतेय कौतुक अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे, परंतु सुदैवाने दोन्ही अधिकारी सुखरूप आहेत. या घटनेनंतर माळशिरस परिसरात या दोन तरुणांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. “जर या तरुणांनी धाडस दाखवले नसते, तर दोन अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला असता,” अशा भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या आहेत.


























