सोलापूर – जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता एका दिव्यांग बांधवासोबत खाली बसून त्यांनी धनादेशाचे आपुलकी व सन्मानाने करून आपला मनाचा मोठेपणा दाखविला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रा.पं.सालसे (ता. करमाळा) येथे ग्रामपंचायत तपासणी दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाचा एक अत्यंत संवेदनशील व भावनिक क्षण अनुभवास आला. सालसे गावातील या वेळचा तो क्षण केवळ धनादेश देण्याचा नव्हता तर तो दिव्यांग बांधवांना एक विश्वास देण्याचा, व आत्मसन्मान जागवण्याचा होता. शिवाय जिल्हा परिषदेचे प्रशासन हे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभे आहे याची जाणीव करून देण्याचा होता.
यावेळी धनादेश मिळताच दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे अश्रू आणि समाधानाचे भाव उपस्थितांच्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणणारे होते. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून आम्हाला मिळालेली ही मदत आमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी वापरणार आहोत तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये आम्हीही सक्रियपणे सहभागी होऊ असा आशावादही यावेळी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी
अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम, सी. आर. सी. उमेश येळवणे, सरपंच सतिश ओहोळ, माजी उपसरपंच सुदामती घाडगे, दशरथ घाडगे, ग्रामपंचायत अधिकारी अनिल कब्जेकर, सदस्य मधुकर हांडे, गाजराबाई काळे, अशोक सालगुडे, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल राशनकर, मुख्याध्यापक हेळगर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.

























