सोलापूर : माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत गणिताचा वापर होत असतो. दैनंदिन व्यवहारात क्षणाक्षणाला प्रत्येक टप्प्यावर ते आपल्याला मार्गदर्शन करते. ती केवळ आकड्यांची भाषा नसून, तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि निर्णयक्षमता विकसित करणारे शास्त्र असल्याने गणित समजून घेतले, तर आयुष्यातील अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. म्हणूनच गणिताशिवाय जीवनाची कल्पनाच अशक्य असल्याचे प्रतिपादन प्राचार्य बी. एस. कट्टे यांनी केले.
भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, गणित हा सर्व विज्ञानांचा राजा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, अर्थकारण या सर्व शाखांचा पाया गणितावर उभा आहे. गणितामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, अचूकता आणि सातत्य निर्माण होते. तसेच समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. गणित शिकणे म्हणजे केवळ परीक्षेसाठी अभ्यास करणे नव्हे, तर विचार करण्याची एक पद्धत असल्याने विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रशामंजुषा स्पर्धेते विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अंजली पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या ढेपे यांनी केले. तर प्रा. आकाश भुसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नीता भास्कर, प्रा. रेश्मा झांबरे, प्रा. ऐश्वर्या मेटे, प्रा. पूजा विटकर, प्रा. दिपाली सातपुते, प्रा. प्रियंका पाटील, प्रा. वृषाली सापटणेकर यांचे सहकार्य लाभले.

























