सोलापूर – शहरात सध्याच्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी स्वतः अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. किसन जाधव यांच्या पक्ष बदलानंतर राष्ट्रवादीने सोलापूर शहरात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे व सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांना तातडीने सोलापूर येथे जाऊन इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शनिवार दि.२७ डिसेंबर रोजी संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवनात बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता प्रभाग ४ आणि ५ येथे आनंद चंदनशिवे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करणार आहे. तर रविवार दि.२८ डिसेंबर रोजी सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहेत, अशी माहिती शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिली.
दरम्यान, सोलापूर राष्ट्रवादीमधील राजकीय परिस्थिती व घडामोडी तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व अन्य बाबींसंदर्भातील आढावा शुक्रवारी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पुण्यात पक्षाचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्यासोबत झालेल्या पहिल्या बैठकीत मांडला. त्यानंतर विचार विनिमय होऊन पुण्यातील बारामती होस्टेल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे, शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते.


























