सोलापूर – शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंहजी यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंह आणि साहिबजादा फतेह सिंह यांनी कोवळ्या वयात बलिदान दिले.त्यांच्या बालशौर्याची गाथा लहान मुलांपर्यंत पोहोचवावी, त्यांच्यामधील धाडसी वृत्ती जागृत होऊन देशसेवेचे बाळकडू लहानपणापासून अंगी बानले जावे, यासाठी प्रत्येक शाळेत बालशौर्य दिन साजरा करावा,असे प्रतिपादन वडाळा येथील श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली जितेंद्र साठे यांनी केले.
राज्याच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत २६ डिसेंबर रोजी बालशौर्य दिन साजरा करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार न्यू हायस्कूलमध्ये लोकमंगल नर्सिंग कॉलेजच्या सहकार्याने बालशौर्य दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्राचार्या डॉ.साठे बोलत होत्या. लोकमंगल नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब बिराजदार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्या डॉ.साठे पुढे म्हणाल्या की,”संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणाऱ्या बालकांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवावा.तसेच त्यांनी ‘धर्म अभिमान’ आणि ‘धर्म अहंकार’ यातील सूक्ष्म फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांची जोपासना करावी.
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य मुलांमध्ये निर्माण व्हावे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.आजच्या पिढीला आपल्या देशातील वीर बालकांच्या ऐतिहासिक शौर्याची ओळख करून देणे काळाची गरज आहे.”
यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक आणि लोकमंगल नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी याप्रसंगी उपस्थिती लावली. त्यांनी बाल शौर्य दिनाचे महत्त्व सांगणारी ओघवती भाषणे आणि देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्राचार्य बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.पर्यवेक्षक प्रा.पी.आर पाटील यांनी प्रास्ताविक केले.संदीप सोनटक्के यांनी आभार मानले.
फोटो ओळी – वडाळा येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित केलेल्या बालशौर्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ.वैशाली साठे.याप्रसंगी लोकमंगल फार्मसी कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब बिराजदार व फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.


























