किनवट / नांदेड : लातूर येथे संपन्न झालेल्या शिक्षक , कर्मचारी व अधिकारी विभागीय स्पर्धेत रमेश मुनेश्वर यांनी एकपात्री अभिनय व रूपेश मुनेश्वर यांनी स्वरचित काव्य सादरकीरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने तालुक्यातील या दोन शिक्षक बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याने सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने दयानंद महविद्यालय , लातूर येथे शिक्षक , कर्मचारी व अधिकारी यांच्या विभागीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
तालुक्यातून प्रथम आलेल्या स्पर्धकांना यात सहभागाची संधी होती. यावेळी भूमिका अभिनय या क्षेत्रातील व्यसनाधीनतेवर मात या विषयावर तालुक्यातील शनिवारपेठ केंद्रातील दरसांगवी ( चि ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी ‘मी हरलो होतो पण जिंकलो ‘ ही एकपात्री नाटिका सादरकरून आणि स्वलिखित काव्य लेखन आणि सादरीकरण स्पर्धेत मोहपूर केंद्रातील लक्कडकोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक रुपेश माधवराव मुनेश्वर यांनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारी ‘ शेतकरी बाप ‘ ही कविता बहारदार सादर करून विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.
या शिक्षक बंधूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल डायटचे प्राचार्य अमोल निळेकर जिल्हा परिषद, नांदेडच्या शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाने, शिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (यो) दिलीपकुमार बनसोडे, किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर जम्पलवाड, मनिषा बडगीरे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, राम बुसमवार, पद्माकर कवटीकवार, रमेश राठोड, रमेश खूपसे, विजय मडावी, राजेश्वर जोशी, चंद्रकांत मोरे, सुरेश पाटील, शेषराव पाटील, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे, इब्टाचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे आदी मान्यवरांसह बहुसंख्य शिक्षक बंधू-भगिनिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

























