बार्शी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शंभरावा वर्धापन दिनानिमित्ताने दि. २६ डिसेंबर रोजी आयटक कामगार केंद्र बार्शी येथे व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विळा हातोडा असणारा कष्टकरी वर्गाचा झेंडा कॉम्रेड भारत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहित व कॉम्रेड कार्ल मार्क्स फॅड्रिक ऐंगल्स यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे सरफराज अहमद, भाकप राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा सेक्रेटरी डॉ. प्रवीण मस्तुद आदी उपस्थित होते.
यावेळी लेखक व पत्रकार सरफराज अहमद म्हणाले, “कष्टकरी वर्गाच्या संघर्षाच्या इतिहासाची साधने हे अत्यंत प्रेरणादायी आहेत, नेमकी तीच नष्ट करण्याचा प्रयत्न फॅसिस्ट भांडवली व्यवस्था करीत आहे. डाव्या कामगार चळवळीचे नेते जगन्नाथ शिंदे, मल्लापा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, किसान सारडा यांच्या सांडलेल्या रक्तावर सोलापूर स्वातंत्र्याआधी तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगता आले. गांधीजींच्या अटकेचा निषेध कामगारांनी केला व इंग्रजांना पळवून लावले हा सोलापूर कम्युन म्हणून नोंद असलेला इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. कवी कुंजविहारी हे डाव्या विचारांचे प्रेरणास्थान होते. त्यांची असणारी हुतात्मा स्मृती मंदिरातील कवितेची कोनशीला उध्वस्त केली गेली आहे. त्यांनी व डाव्या चळवळीतील नेत्यांनी मिळून सोलापुरातील सिंधीची झाडे तोडून कामगारांना नशेपासून दूर केले, बुवा बाबा यांच्यापासून दूर केले, दंगलीपासून रोखले, वृत्तपत्रे सुरु केली असे नैस्तिक अधिष्ठान निर्माण करुन दिले. बेगमपुरा भागातील दारुमुतालिया हे डाव्या चळवळीचे अभ्यास केंद्र होते तेथे चळवळीच्या तत्वज्ञानाच्या बैठकीचा अभ्यास केला जात असे. या सर्वांचे फलित म्हणून १९४५ साली प्रगतीशिल लेखक संघाचे अधिवेशन होऊन सोलापुरात फैज अहमद फैज, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आले. एम.एन. रॉय यांनी मानवतावादी परिषद घेतली, त्याला देखील डाव्या चळवळीने साथ दिली. कुरबान हुसेन यांनी गजलफत हे वर्तमानपत्र चालवले त्यामध्ये लिहिलेल्या अग्रलेखात त्यांनी आम्ही बोलशेवीक क्रांतीचे समर्थक म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकले जात आहे, कामाचे तास कमी केले पाहिजेत, मालकाच्या नफ्यातून मजुरीचा हिस्सा वाढला पाहिजे, पोटभर अन्न -अंगभर कपडे, चांगली घरे, पेन्शन मिळाली पाहिजे अशी मागणी ते अग्रलेखात करतात.
यावेळी कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले, डाव्या चळवळीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने तयार झालेला फॅसिस्ट हिटलरी विचाराला कम्युनिस्ट पक्षाने निस्तनाभूत करुन टाकले आहे.
यावेळी अध्यक्ष कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद म्हणाले, कार्ल मार्क्स यांनी दिलेल्या कम्युनिस्ट जाहीरनाम्यातून प्रेरणा घेत भारत देशामध्ये श्रमिक वर्गाच्या चळवळीला सुरुवात झाली १९२० साली देशातील पहिली आयटक ही कामगार संघटना सुरु होऊन पुढे १९२५ साली कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला जो पक्ष सातत्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी,दलित, महिला, मजूर ,अल्पसंख्यांक , युवक ,विद्यार्थी यांच्यासाठी काम करत आहे. स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कडवा संघर्ष करत कम्युनिस्टांनी फाशी स्वीकारली; रक्त सांडले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्रा. हेमंत शिंदे, आंबेडकरी चळवळीचे नेते प्रा. डी.डी. मस्के, पुरोगामी विचार मंचचे रमेश गवळी, प्रा. अशोक वाघमारे, शेतकरी कामगार पक्षाचे कॉ. रविकुमार कानगुडे, पक्षाचे सहसचिव कॉ.अजित लंगडे, कॉ. सतीश गायकवाड, कॉ. राजेंद्र करली, कॉ. महादेव पारसे, पै. मतीन शेख, डॉ. दिलीप कदम, अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. लक्ष्मण घाडगे, दलित अधिकारांदोलनाचे कॉ. बालाजी शितोळे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, .बांधकाम कामगार संघटना, अर्धवेळ आरोग्य स्त्री परीचर कर्मचारी संघटना, बार्शी नगरपालिका कंत्राटी कामगार संघटना यांचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन कॉ. अनिरुद्ध नखाते यांनी केले. लहू आगलावे, भरत चव्हाण, श्रीकांत सोरेगावकर, आनंद गुरव , प्रमोद मंडलिक, सतीश जामदार , कॉ. शौकत शेख, चंद्रकांत देशमुख, निर्मला सरवदे, प्रमिला शिंदे , सुवर्णा नंदाने, छबुबाई ढोरे , सोनाली कदम, सुनील ढगे, अंजू तेवर आदी पस्थित होते.


























