सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल व लोकशक्ती व जय हिंद या साखर कारखान्यांकडून अद्याप ऊस दर जाहीर न करताच ऊसाचे गाळप सुरू आहे. इतर तालुक्यातील व कर्नाटकातील सीमावर्ती भागातील कारखान्यांकडून तीन हजार रूपये दर जाहीर करण्यात आले असताना दक्षिणमधील कारखानदार मात्र ऊस दर जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. बसवनगरच्या लोकशक्ती कारखान्याचा गाळप गाजावाजा करण्यात आला. मात्र ऊसदर जाहीर न करताच एक महिन्यांपासून ऊस गाळप सुरू आहे. त्यामुळे सीना भीमा नदीकाठावरील शेतकर्यांचे ऊसदराकडे लक्ष लागून राहीला आहे. दक्षिणमधील तीनही कारखान्यांकडून ऊस दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र शेतकरी हितापेक्षा कारखानाहिताला प्राधान्य देणार्या कारखानदारांकडून ऊसदर प्रलंबित ठेऊन गाळप करण्यात येत आहे. त्यामुळे संथ गतीने ऊस गाळप सुरू आहे .त्यामुळे दक्षिण मधील शेतकऱ्यांची ऊस तोडणी थांबल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्या बाहेरील उर्वरित कारखान्यांकडून कमी प्रमाणात ऊस तोडणी होत असल्यामुळे दक्षिणचे शेतकरी तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत .
दक्षिणमधील भंडारकवठे येथील लोकमंगल हा कारखाना वीस वर्षांपासून सुरू असल्यामुळे व सीमावर्ती भागातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे ऊस मोठ्या प्रमाणात गाळप करण्यात येते. यंदा या कारखान्यांकडून २७०० रूपये दर देण्यात येत असल्याने कारखान्याने ३००० पेक्षा अधिक दर देण्याची मागणी करत शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे . मात्र कारखान्यांकडून २७०० पेक्षा अधिक दर न देता ऊस तोडणी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उडी टाकून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच गुंजेगाव परिसरात ऊस वाहतूक करणारी वाहने थांबवून ३००० पेक्षा अधिक दर देण्याची मागणी केली . याशिवाय कारखान्यासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र कारखाना प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ऊस तोडणी थांबल्याचे दिसून येत आहे .
दहा वर्षापेक्षा अधिक काळ बंद असलेला व महिनाभरापूर्वी सुरू झालेला बसवनगर येथील लोकशक्ती कारखान्याचे गाळप मोठ्या थाटात करण्यात आला. मात्र यावेळी ऊस दर जाहीर न करताच ऊस तोडणी करण्यात येत आहे. कारखान्याकडे वाहनांची संख्या कमी असल्यामुळे व अनेक शेतकरी या कारखान्याला ऊस घालण्याचे टाळत असल्यामुळे कारखाना संथ गतीने सुरू आहे . त्यामुळे लोकशक्ती कारखान्याने ऊस दर जाहीर करावे , अन्यथा कारखान्या कार्यालयासमोर आंदोलन करून वाहने अडविण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. आचेगाव येथील जय हिंद कारखान्यानेही ऊसदर जाहीर केला नाही. दक्षिण मधील सीना व भीमा नदी काठावरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लोकमंगल , लोकशक्ती, जयहिंद,गोकुळ ,मातोश्री , सिद्धेश्वर, सिद्धनाथ व जकराया यासह इतर कारखान्यांकडून ऊस गाळप करण्यात येते . मात्र यामधील अनेक कारखान्यांनी ऊस दर जाहीर न केल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस न देता शेतातच ऊस ठेवणे पसंद केला आहे .त्यामुळे सिद्धेश्वर ,लोकमंगल , लोकशक्ती व जय हिंद यासह अनेक कारखान्यांचे गाळप कमी दाबाने सुरू आहे . मात्र यामुळे उसाचा कालावधी संपलेल्या शेतकऱ्यांवर वजन घटण्याचे संकट ओढवले असून लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
…
…
३००० पेक्षा अधिक दर द्यावे
…
दक्षिणमधील सीना भीमा नदी काठावर मोठ्या प्रमाणात ऊस आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर जाहीर न करताच उसाचे गाळप सुरू आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे . म्हणून कारखानदारांनी त्वरित ३००० पेक्षा अधिक जाहीर दर जाहीर करावे , अन्यथा ऊसतोडणी करू देणार नाही.
जावीद आवटे , तालुका अध्यक्ष , अखिल भारतीय किसान सभा , दक्षिण सोलापूर


























