सोलापूर – श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बाल पूर्व प्राथमिक मंदिर शाळेत आज शुक्रवार दि. २/०१/२०२६ रोजी श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेत सुंदर अशा सिद्धमय वातावरणात गड्डा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय उपक्रम हे मुलांना उत्तरोत्तर यशस्वीतेकडे घेऊन जातात प्रत्येक उपक्रम हा त्यांच्या ज्ञानात भर टाकीत असतो, त्यातून फक्त ज्ञानाचीच किंवा अध्ययनाचीच कक्षा रुंदावते असे नाही, तर बालकांचा सर्वांगीण विकास होत असतो ,त्यांना आनंद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, शाळेबद्दलची गोडी निर्माण होणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
याप्रसंगी शाळेत ६८ लिंग प्रतिकृती ,विविध खेळाचे साहित्य, खेळणी व खाऊचे दुकाने यामुळे शाळेच्या प्रांगणास गड्ड्याचे स्वरूप आले होते. बाराबंदी घातलेले बालचिमुकले व सात काठ्यांचे छोटे मानकरी यांच्या समवेत संबळाच्या नादात श्री सिद्धेश्वरांची आरती करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या यात्रेचे उद्घाटन इरा किड्सच्या संचालिका मा. मुलीमनी मॅडम तसेच सिद्धेश नर्सरीच्या संचालिका मा.बिराजदार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा हेब्बाळ व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्मिता कोरवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक शिक्षक संघ यांनी परिश्रम घेतले.

















