सोलापूर – श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बुधवारी सिद्धेश्वर मंदिर परिसरात व्यापक स्वरूपात पोलिसांची मॉक ड्रिल राबविण्यात आली. या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार, गोंधळ किंवा आपत्कालीन घटना घडू नये, तसेच तशी परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ, नियोजनबद्ध व प्रभावी कारवाई करता यावी, हा होता. मॉक ड्रिलदरम्यान मंदिर परिसर, मुख्य प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, दर्शन रांगा तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी गर्दी नियंत्रण, संशयित व्यक्तींची तपासणी, बॉम्ब शोध पथकाची हालचाल आणि आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्याचा सराव करण्यात आला.
या सरावात पोलीस अधिकारी व कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, वाहतूक पोलीस, स्ट्राइक फोर्स तसेच विविध आपत्कालीन सेवांचे पथक सहभागी झाले होते. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे आणि परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. यात्रा काळात सिद्धेश्वर मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाणार आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर आणि अतिरिक्त पोलिस मनुष्यबळाची तैनातीही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने भाविकांची सुरक्षा, शिस्त व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हेच पोलिस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

















