लासूर स्टेशन – गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन बाजारपेठेचे श्रद्धास्थान असलेल्या सावंगी येथील श्री भैरवनाथ भगवान यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार (दि. ११ जानेवारी) रोजी सुरू होणार असून, यावर्षीपासून हा यात्रा महोत्सव तीन दिवस चालणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून सुमारे एक लाखांहुन अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
लासूर स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगी (ता. गंगापूर) या छोट्याशा गावात सुमारे साठ वर्षांपूर्वी धोडीबा पांडुरंग इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेवाच्या आठ अवतारांपैकी
काल भैरवनाथ व लाल स्वामी भैरवनाथ या दोन अवतारांची मूर्ती सोनेरी जोगेश्वरी (जि. अहमदनगर) येथून आणून विधीवत स्थापना करण्यात आली.
भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की, भैरवनाथ भगवान दर्शनाने सर्पदंश झालेल्या व्यक्तीस त्वरित आराम मिळतो. तसेच मंदिर परिसरातील वाळू श्रद्धेने घरी नेऊन देव्हाऱ्यात व घराभोवती फिरवल्यास नागदेवतेपासून संरक्षण होते,
अशी लोकांची धारणा आहे. अनेक भाविकांना याचा प्रत्यय आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दूरदूरच्या भागातून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात.
नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात दरवर्षी भाविक नवस फेडण्यासाठी कुटुंबासह उपस्थित राहतात. दाल–बट्टीचा नैवेद्य, भंडाऱ्याची पंगत घालून आपले मनोरथ पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करतात.
यावर्षी तीन दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक व धार्मिक संस्थांच्या वतीने मंदिर परिसरात लवकरच अन्नछत्र सुरू करण्यात येणार असल्याचे माहिती संस्थानचे संजय पांडव यांनी दिली आहे.
त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यात्रेनिमित्त तीनही दिवस मंदिर परिसरात लहान मुलांसाठी पाळणे,पान–फुलांची दुकाने तसेच महिलांसाठी संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जातात.यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचा फड रंगणार असून,दुसऱ्या दिवशी
कुस्तीचा आखाडा भरवण्यात येणार आहे.तसेच दर रविवारी भरणारा लासूर स्टेशनचा आठवडी बाजार या काळात मंदिर परिसरातच भरवण्यात येतो.
परिसरातील नागरिक,शेतकरी व पंचक्रोशीतील भाविक आपल्या कुटुंबासह मोठ्या उत्साहात या तीन दिवसीय यात्रेचा आनंद घेताना दिसतात.यात्रेचे नियोजन व व्यवस्थापन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य स्वरूपात करण्यात आले आहे.
चौकट
दरवर्षीप्रमाणे रविवार (दि. ११ जानेवारी) रोजी श्री भैरवनाथ भगवान यात्रा सुरू होत असून यावर्षीपासून यात्रा तीन दिवस चालणार आहे.
नवसाला पावणारे व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अशी या मंदिराची ओळख आहे.
यात्रेच्या आठ दिवस आधीपासून तसेच नंतर जवळपास एक महिना भाविक येथे येऊन रोडग्याचा महाप्रसाद करतात.
ग्रामस्थांच्या सहकार्याने व पंचक्रोशीतील लोकवर्गणीतून मंदिराचा सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचा जिर्णोद्धार पूर्ण झाला आहे.
– मीना पांडव,
सरपंच, लासूर स्टेशन


















