अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अवैधरीत्या लॉज व्यवसाय बोकाळला असून शासनाचे नियम धाब्यावर बसून हा व्यवसाय बिनबोभाट पणे सुरू आहे.या व्यवसायाला प्रशासनाचे अभय असल्याची चर्चा अक्कलकोट शहरात रंगली आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त हे येत असतात. शासकीय सुट्ट्या , पौर्णिमा , विविध धार्मिक उत्सव , सण या निमित्त दर्शनासाठी अक्कलकोट नगरीत परगावचे लाखो भाविक भक्त येत असतात. परगावच्या भाविकांना राहण्याची सोय व्हावी यासाठी अक्कलकोट शहरात खाजगी लॉज व्यवसायाला पेव फुटले आहे. गेल्या सात-आठ वर्षात अक्कलकोट नगरीत अवैधरीत्या लॉज व्यवसाय वाढला आहे. शहरातील मैंदर्गी रोड , बासलेगाव रोड , श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर , श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर आदींसह अनेक नागरी वस्त्यांमध्ये अवैधरित्या लॉज व्यवसाय सुरू आहे. अक्कलकोट नगरीत सतत भाविकांची गर्दी पडत आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्तनिवास तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील यात्री निवास व भक्तनिवास हे भाविकांना निवासासाठी राहण्याची सोय या ठिकाणी केली जाते.
यात्राकाळात परगावच्या भाविकांना निवासासाठी खाजगी लॉजवर मुक्कामासाठी राहावे लागत आहे. शहरातील अवैद्य लॉज व्यवसायिक हे पारगावच्या भाविकांची आर्थिक लूट करत आहेत. तसेच शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसून हा गोरख व्यवसाय सुरू आहे. अनेक लॉज चालक हे पैशासाठी कोणतेही ठोस पुरावे न घेता परगावच्या भाविकांना राहण्यासाठी खोल्या देत आहेत .अनेक लॉजवर अग्निशमन यंत्रणा नाही , तसेच चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही, प्रशासनाकडे लॉजची रीतसर नोंद नाही. एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या अवैध लॉज व्यवसायिकांना अभय मिळत आहे. अक्कलकोट शहरात अवैध लॉजमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा चार चाकी वाहने उभी केली जात आहेत. लॉजवाल्यांनी पार्किंगची व्यवस्था न केल्याने परगावच्या भाविकांना पोलीस प्रशासनाकडून दंड वसूल केला जात आहे. यामुळे परगावच्या भाविकांना नाहक आर्थिक भार सोसावा लागत आहे. अक्कलकोट शहरात ४ जानेवारी रोजी खाजगी लॉजच्या रूमवर एका बावीस वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. यामुळे अवैध लॉज व्यवसायिक हे पैशासाठी कोणालाही राहण्यासाठी खोल्या देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अवैध लॉज व्यवसायिकांची कायदेशीर चौकशी करून शासकीय नियम धाब्यावर बसविणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे .पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्वच लॉजची तपासणी करून जे नियमबाह्यपणे व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अक्कलकोट शहरातील नागरिकांतून करण्यात येत आहे.


















