सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाळे परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधला.
यावेळी प्रभागातील विकास, नागरी सुविधा आणि भविष्यातील योजनांबाबत त्यांनी आपले मत मांडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, भाग्यश्री काळे, महादेवी रणदिवे यांच्यासह पक्षाच्या युवती प्रदेश उपाध्यक्ष संध्याताई सोनवणे, शहर जिल्हा युवक अध्यक्ष सुहास कदम आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री भरणे यांनी बाळे येथील बिरोबा देवस्थान येथे दर्शन घेतले तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर बाळे परिसरातील विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी यावर भर दिला. विकासाचे स्पष्ट व्हिजन असलेले आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांकडून या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, विविध पक्षांतील बबलू पठाण, बंटी पसारे, हुसेन शेख साई, शाहिद शेख, अजिंक्य सुरवसे, विक्रांत पोळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

















